‘बसंती.. इन कुत्तो के सामने मत नाचना..’, ‘कितने आदमी थे..’ असे अनेक अजरामर डायलॉग देणारा सिनेमा म्हणजे एव्हरग्रीन ‘शोले’. यातला गब्बर, जय-...
‘बसंती.. इन कुत्तो के सामने मत नाचना..’, ‘कितने आदमी थे..’ असे अनेक अजरामर डायलॉग देणारा सिनेमा म्हणजे एव्हरग्रीन ‘शोले’. यातला गब्बर, जय-विरू की जोडी, सुरमा भोपाली, ठाकूर, कालिया, बसंती, मौसी, चाचा असे रोल अजूनही प्रेक्षकांच्या डोस्क्यात घुमतात. एका वरचढ एक असेच हे कॅरक्टर आहेत. म्हणूनच अजूनही अबाल-वृद्धांना हा सिनेमा ‘आपलासा’ वाटतो.
चित्रपटांची चर्चा सुरू झाली आणि ती ‘शोले’वर किमान एका ओळीसाठी तरी आलीच नाही असे या भारतात तरी अशक्य आहे. इतका या सिनेमाचा पगडा भारतीय रसिकांवर आहे. आज आपण या लेखात त्याचीच काही माहिती पाहणार आहोत. शोले हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे फ़क़्त एकाच लेखात तो संपून जाईल असे नाही. मात्र, काही मुद्दे राहिले आणि अभ्यासात सापडले तर, पुढचा लेख लिहायला घेऊयातच की..
१९७५ सालचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे शोले. त्यावेळी शंभरच्या वर चित्रपटगृहांत ‘७५ आठवडे टिकून राहणारा पहिला भारतीय चित्रपट’ असा विक्रम शोलेच्या नावावर आहे. त्यावेळी काही असा सोशल मिडियाचा जमाना नव्हता. जाहिरात म्हणजे तोंडी चर्चा किंवा अफवा. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर सुरुवातीचे दोन आठवडे या प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असतानाही ज्यांनी पाहिला त्यांनी चर्चा करून हा सिनेमा आणखी लोकांना पाहायला उद्युक्त केले. नंतर महिन्याने कुठे खऱ्या अर्थाने तिकिटबारीवर हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचू लागला.
७० मिमी चित्रफीत पद्धती यांचा वापर केलेला हा पहिला भारतीय चित्रपट. तत्पूर्वी सिनेमा ३५ मिमीवर चित्रित केला जायचा. ही कथा प्रसिद्ध चित्रपट कथा-पटकथा लेखक जोडी सलीम खान-जावेद अख्तर यांची आहे. जपानी ‘द सेव्हन समुराई’ आणि इतरही काही पाश्चात्य सिनेमाचा त्यावर प्रभाव होता. हिंसाचाराचे समर्थन, कौटुंबिक पार्श्वभूमी, तत्कालीन समाजाची आणि समस्यांची ओळख असे अनेक मुद्दे या सिनेमाच्या कथेतून दिसतात.
‘सिर्फ एक मुठ्ठी अनाज’साठी यातला डाकू गब्बरसिंग जनतेला छळत असतो. यातला गब्बर नेमका कोणत्या पार्श्वभूमीवर डाकू झाला हे जरी अनुत्तरीत राहिले असले तरी फ़क़्त धान्यासाठी जनतेचा मुडदा पडण्याचा तो काळ दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी भन्नाट उभा केला आहे. त्तम अभिनय, सशक्त दिग्दर्शन, उत्कृष्ट संकलन, वैशिष्ट्यपूर्ण कथा, वेगवान साहसदृश्ये आणि लोकप्रिय संगीत ही याची वैशिष्ट्ये आहेतच. मात्र, माणसांचे प्रेम, द्वेष, असूया आणि लालसा यांचाही यात सुरेख संगम आहे.
निवृत्त पोलिस अधिकारी एका दरोडेखोराचा बदला घेण्यासाठी दोन भुरट्या गुन्हेगारांची मदत घेण्याची ही स्टोरी आहे. यातले रामगढ आठवतेय ना? सगळी पार्श्वभूमी उत्तर भारतीय वाटते. मात्र, वास्तवात हा सिनेमा दक्षिण भारतात शूट झालेला आहे. गब्बरच्या अड्ड्यावरचे मोठे दगड आहेत तेही दक्षिण भारतीय प्रदेशातलेच. कर्नाटकच्या बंगळूर-म्हैसूर दरम्यानच्या भागात रामनगरम आहे. तिथेच याचे शुटींग झाले.
निर्माता जी. पी. सिप्पी म्हणजे अनुभवी आणि चोखंदळ. त्यांनाच सलीम-जावेद जोडीने एक कथा सांगितली. किती तर फ़क़्त ४ ओळीची. कथा होती की, ‘आर्मी ऑफिसरच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल होते. बदला घेण्यासाठी त्याला सैन्यातून कोर्ट मार्शल करून हाकलून दिलेल्या दोन ज्युनियरची आठवण होते. तो त्यांचा शोध घेऊन त्यांना तयार करतो. हे दोघे लबाड आणि बदमाश पैशासाठी गावात येतात आणि बदला पूर्ण करतात.’
येस, हीच थीमलाईन होती. सिप्पींना ही आवडली आणि त्यांनी कथाविस्तार करायला लावला. कथाही झाली. परंतु, मग आर्मीच्या लाईनवर करायची म्हणजे परवानगीचे लचांड होते. ते टाळण्यासाठी पुन्हा-पुन्हा बैठका झाल्या आणि आता आपण सिनेमात पाहतो ती भन्नाट कथा उभा राहिली. मग शुभ्र कपड्यातला ठाकूर तयार रेखाटला गेला. लेखक सलीम खान यांचे वडील इंदूरमध्ये डीआयजी होते. त्यांनीच वडिलांकडून गब्बरसिंग नावाच्या डाकूच्या कथा ऐकल्या होत्या. मग त्यांनी डाकूचे पात्र तयार केले. संजीवकुमार, धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे रोल ठरले. जयसाठी सिप्पीच्या डोक्यात शत्रुघ्न सिन्हा होता. तर, इतरांना अमिताभ बच्चन यासाठी फिट्ट वाटत होता. अमिताभचा ‘रास्ते का पत्थर’मुळे त्याला शोले मिळाला.
अहो, पहिला भाग संपलाय की.. पुढचे भाग वाचायला पुन्हा भेटूया.. तोपर्यंत ‘इंटरव्हल’..!
(भाग १)
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS