मुंबई : मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपली क्रेझ निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे आपल्यासमोर पहिल...
मुंबई :
मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर आपली क्रेझ निर्माण करणारी अभिनेत्री पूजा सावंत हे आपल्यासमोर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. ‘बळी’ या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी आपल्यासमोर आलेली आहे.
तरुणांच्या गळ्यातील ताईत असलेला, महाराष्ट्राचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीसह सौंदर्य आणि अभिनयाचे अजोड मिश्रण असलेली गुणी अभिनेत्री पूजा सावंत या दोघांची नवी केमिस्ट्री ‘बळी’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील हा प्रमुख भूमिकेत असून पूजा एका डॉक्टरची भूमिका साकारत आहे.
या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेविषयी पूजाने भरभरून सांगितले आहे. ती म्हणाली की, विशाल फुरीयाच्या दुसऱ्या चित्रपटात म्हणजे ‘बळी’मध्येसुद्धा मी महत्वाच्या भूमिकेत आहे. आपल्याला काय साध्य करायचे आहे आणि त्यासाठी काय करण्याची गरज आहे, याची परिपूर्ण काल्पना असलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची मजा काही औरच असते. तेच विशालच्या बाबतीत म्हणता येईल. या चित्रपटात काम करण्याचा आनंद दुहेरी होता कारण मला या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच स्वप्निल जोशीबरोबर काम करण्याची संधी मिळाली. स्वप्निल हा चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान असा कलाकार असून त्याच्याबरोबर काम करण्याची मला इच्छा होतीच.
पूजाने आपल्या अभिनयाने या आधीही प्रेक्षकांना वेड लावलेले आहेच. आताही ती एका नव्या आणि भन्नाट भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी पूजाने क्षणभर विश्रांती, दगडी चाळ, बोनस या चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा दमदार ठसा उमटवला.
त्यानंतर प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घाई यांच्या ‘विजेता’ या हिंदी चित्रपटामधून आपल्या अभिनयाची चुणूक हिंदी सिनेसृष्टीला दाखवून दिली.
‘बळी’ या चित्रपटाची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. ‘जीसिम्स’ (ग्लोबल स्पोर्ट्स एन्टरटेन्मेंट अँड मिडिया सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड)च्या माध्यमातून अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार हे कार्यरत आहेत.
विशेष बाब म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फुरिया यांच्यासोबत पूजा दुसऱ्यांदा काम करते आहे. ‘बळी’ हा पूजाचा विशाल फुरियाबरोबरचा दुसरा चित्रपट आहे. तिने ‘लपाछापी’ या त्याच्या गाजलेल्या व प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनी नावाजलेल्या चित्रपटात काम केले होते. १६ एप्रिल २०२१ रोजी हा बहुचर्चित चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
या चित्रपटाचे पोस्टर आपल्यासमोर आलेले असून यात पूजा डॉक्टरच्या भूमिकेत आहे, हे सहजच लक्षात येते. पोस्टरमधील तिचा लुक बघता या चित्रपटातही आपल्या अभिनयाने पूजा प्रेक्षकांना भुरळ घालणार, हे नक्कीच.
चित्रपटाविषयी अधिक बोलताना पूजाने म्हटले की, ‘बळी’मध्ये काम करण्याचे २ गोष्टींमुळे समाधान मिळाले. त्यापैकी एक म्हणजे, विशाल सोबत माझा हा दुसरा चित्रपट आहे. त्यामुळे मी त्याच्यासोबत काम करताना एकदम बिनधास्त राहिले. कारण विशाल हा असा दिग्दर्शक आहे की जो अभिनेत्यामधील १०० टक्के क्षमतेचा वापर करून घेतो आणि दुसरे म्हणजे या चित्रपटात मी जी डॉक्टरची भूमिका करत आहे ती या कथेचा एक अविभाज्य आणि महत्वाचा भाग आहे. विशालचा पहिला थ्रिलर चित्रपट ‘लपाछपी’हा खूप यशस्वी ठरला होता आणि त्यात दिग्दर्शक म्हणून त्याची कामगिरी फारच उजवी झाली होती.
पुढे बोलताना तिने सांगितले की, लपाछपी’मध्ये त्याची दिग्दर्शकीय क्षमता अगदी जवळून पहिली होती आणि त्यामुळे त्याने जेव्हा या चित्रपटासाठी विचारले तेव्हा नाही म्हणायचे काही करणाच नव्हते. मला हॉरर चित्रपटांची खूप भीती वाटत असे. असे चित्रपट पाहताना पूर्वी मी दारे आणि खिडक्या उघड्या ठेवून ते पाहत असते. पण ‘लपाछपी’नंतर आता त्यात थोडासा बदल झाला आहे. आता मला अशा चित्रपटांमध्ये काम करण्याचा तर आत्मविश्वास आलाच आहे पण त्याचबरोबर हॉरर चित्रपट मी आता बिनधास्तपणे पाहतेसुद्धा. ‘लपाछपी’ माझ्या चित्रपट कारकिर्दीतील एक टर्निंग पॉइंट होता.
संपादन : विनोद सूर्यवंशी
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS