मुंबई : ‘कोण आहे एलिझाबेथ?’ असा प्रश्न उपस्थित करणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा प्रश्न घेऊन येणाऱ्या थरारपटाचे नाव आहे ‘बळी...
मुंबई :
‘कोण आहे एलिझाबेथ?’ असा प्रश्न उपस्थित करणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा प्रश्न घेऊन येणाऱ्या थरारपटाचे नाव आहे ‘बळी’. यातला बळी कोण हे 100 टक्के स्पष्ट झालेले नसले तरीही ‘चॉकलेट बॉय’ अभिनेता स्वप्नील जोशी मुख्य भूमिकेत असून पोस्टरवर त्याचाच रक्तरंजित चेहरा झळकलेला आहे.
या हॉरर मराठी चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ यांनी केली आहे. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या आगामी चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील मुख्य भूमिका करणाऱ्या स्वप्नीलचा रक्तरंजित चेहराचा अनेक प्रश्न निर्माण करीत असताना ‘कोण आहे एलिझाबेथ? असा आणखी थेट प्रश्न करून याच पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली आहे.
स्वप्नीलचा हा लूक पाहणाऱ्याच्या काळजात धडकी भरवणाराच आहे. ‘जीसिम्स’ यांनी यापूर्वीही ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ हे गाजलेले मराठी चित्रपट आणि ‘समांतर-1’ आणि ‘समांतर-2’ तसेच ‘नक्सलबारी’ यांसारख्या वेबसिरीजची निर्मिती केली आहे. त्यामुळे काहीतरी भन्नाट आणि अफलातून असेच या ‘बळी’मध्ये पाहायला मिळण्याची प्रेक्षकांना खात्री वाटत आहे.
दिग्दर्शक विशाल फुरिया हे ‘लपाछपी’ या तीन वर्षांपूर्वी आलेल्या आणि गाजलेल्या थ्रिलर चित्रपटाने प्रकाशझोतात असतात. त्या पार्श्वभूमीवर हा बळी म्हणजे त्यांचा थ्रिलरपट असणार असेच पोस्टर पाहूनही वाटते. त्या उस्तुकतेला हा चित्रपट कितपत शमवतो हे 16 एप्रिल 2021 ला चित्रपटगृहात रिलीज झाल्यावरच समजणार आहे.
लपाछपी’ला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. मराठी प्रेक्षकांना हॉरर चित्रपट आवडतात, हे त्याने दाखवून दिले. ती दाद हीच मराठी प्रेक्षकांसाठी हॉरर चित्रपट बनवित राहण्याची प्रेरणा आहे. त्याचाच एक भाग म्हणून बळी या भयपटाचे दिग्दर्शन करत असल्याचे फुरिया यांनी म्हटले आहे.
तर, अभिनेता स्वप्नील याने म्हटले आहे की, यंदा नव्या प्रकारातील चित्रपट करण्याचे आश्वासन गेल्यावर्षीच मी प्रेक्षकांना दिले होते. त्या दृष्टीने उचललेले हे एक पाऊल आहे. हॉरर चित्रपट करण्याची संधी मिळणे हे भाग्य समजतो. यावेळी कार्तिक, अर्जुन यांच्यासारखे आवडते निर्माते लाभले आणि माझा लाडका दिग्दर्शक विशाल हा चित्रपट दिग्दर्शित करीत आहे. त्यामुळे पूर्ण खात्री आहे की, आम्ही सगळेच प्रेक्षकांना घाबरवू आणि प्रेक्षकही त्या भीतीचा चांगलाच आनंद घेतील.
पोस्टरवरून चित्रपटाची कथा आणि पटकथा भीतीदायक असेल, याचीच कल्पना येते. त्यावर स्वप्नीलने म्हटले आहे की, मराठी चित्रपटाने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा भन्नाट प्रयोग केलेला नाही. यापूर्वी हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग अनेकांना आवडले. परंतु, झोप उडवेल असा मराठी चित्रपट झालाच नाही. ‘बळी’ हा सिनेमा तीच पोकळी नक्कीच भरून काढेल असा विश्वास वाटतो. या चित्रपटाची कथाच तुम्हाला घाबरवून टाकते. भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण केला जाणारा प्रकार यात अजिबात नसेल.
स्वप्नीलने त्याच्या इन्स्टाग्रामवर बळी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये स्वप्नीलच्या अत्यंत भेदरलेल्या डोळ्यात भयंकर भीतीची भावनाही दिसत आहे. त्यावेळी लाल रंगाचं क्रॉस त्याच्या दोन्ही डोळ्यात चमकत आहे. कपाळावरून रक्त वाहत असतानाच आपल्यावर कोणीतरी वार करणार या भावनेने तो घाबरून ओरडत असल्याचे या चित्रपटाच्या पोस्टरवर दिसत आहे. त्याखाली 'कोण आहे एलिझाबेथ?' असा विचारलेला प्रश्न सर्वांच्या डोळ्यामध्ये भीतीचे भाव आणण्यासाठी पुरेसा आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS