Source : Haribhoomi श्रीदेवी आणि जयाप्रदा.. अलौकिक, अनुपम असे सौंदर्य, जोडीला कसदार अभिनय..ऐंशीच्या दशकात या दोन्ही अभिनेत्रींनी पडद्यावर ...
![]() |
Source : Haribhoomi |
श्रीदेवी आणि जयाप्रदा.. अलौकिक, अनुपम असे सौंदर्य, जोडीला कसदार अभिनय..ऐंशीच्या दशकात या दोन्ही अभिनेत्रींनी पडद्यावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यांची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक बेभान होत. अनेक हिरो या अभिनेत्रींसोबत काम करण्यासाठी एका पायावर तयार असत. मात्र, या दोघींमधून त्यावेळी विस्तवही जात नव्हता.. अगदी शेजारून गेल्या, तरी त्या एकमेकींकडे पाहतही नसत. बॉलिवूडची 'नंबर वन' अभिनेत्री होण्याच्या स्पर्धेत त्या एकमेकींना सतत पाण्यात पाहत राहिल्या. त्यांनी हा अबोला सोडावा, म्हणून या दोघीना चक्क तासभर एका खोलीत डांबून ठेवले होते. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही.
सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील 'इंडियन आयडॉल' हा लोकप्रिय कार्यक्रम आहे. इंडियन आयडॉलचा बाराव्या सीझनमध्ये नुकतीच अभिनेत्री जया प्रदा यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचा होस्ट जय भानुशाली, परीक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया यांनी जयाप्रदा यांचे खास स्वागत केले. जया प्रदा सेट्सवर येणार म्हणून सगळे स्पर्धक खूप आनंदीत होते. इंडियन आयडॉलच्या सेट्सवर जयाप्रदा यांनी अभिनेत्यांबरोबर असलेले नातेसंबंध उलगडून दाखवले. यावेळी त्यांनी श्रीदेवी आणि तिच्याबरोबर नाते याविषयी मन मोकळे केले.
जया प्रदा म्हणाल्या, ''मी स्वतःला खूप नशीबवान मानते, की मला श्रीदेवीसारख्या अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली. आमच्या दोघींमध्ये कधीही वैयक्तिक वितुष्ट नव्हते; पण आमच्या तारा कधीच जुळल्या नाहीत. आम्ही कधीही एकमेकींशी नजर मिळवली नाही, कारण आमच्या दोघींमध्ये एक स्पर्धा होती.. मग ती पोशाखाची असो किंवा डान्सची! प्रत्येक वेळी जेव्हा आम्ही भेटायचो, तेव्हा आमचा एकमेकींशी परिचय करून देण्यात यायचा. आम्ही फक्त एकमेकींना 'नमस्ते' म्हणून निघून जायचो.''
श्रीदेवीसोबतच्या आठवणींना उजाळा देताना जयाप्रदा भूतकाळात हरवल्या होत्या. त्या पुढे म्हणाल्या, की ''मला अजून आठवते, की 'मकसद' चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळेस जितूजी (जितेंद्र) आणि राजेश खन्नाजी यांनी आम्हा दोघींना एका मेकअप रूममध्ये जवळपास एक तासभर कोंडून ठेवले होते; पण आम्ही दोघी एकमेकींशी एक शब्दही बोललो नाही. त्यानंतर सगळ्यांनीच आमच्यासमोर हात टेकले.''
"आज श्रीदेवी आपल्यात नाहीये, तर मला तिची खूप आठवण येत आहे. मला एकाकी वाटते, कारण या बॉलीवूड उद्योगातली ती माझी मोठी प्रतिस्पर्धी होती. ती जर मला कुठूनही ऐकू शकत असेल, तर या मंचावरून मी हेच म्हणेन की, 'आम्ही एकमेकींशी बोलू शकलो असतो, तर बरे झाले असते..' असे म्हणताना जयाप्रदा काहीशा भावुक झाल्या होत्या.
जयाप्रदा म्हणाल्या, की ''श्रीदेवी आणि माझ्यामध्ये कधीच भावनिक नाते नव्हते आणि सेटवर आम्ही कधी एकमेकींशी बोललो नाही; पण श्रीदेवी ही बॉलिवूडमधली तिची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी होती..त्यामुळे इच्छा असूनही आम्हाला एकमेकींसोबत बोलता आले नाही..''
संपादन : सोनाली पवार
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS