1968 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला. हा चित्रपट बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात थिएटरम...
1968 मध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला ज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धमाका केला. हा चित्रपट बघण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात थिएटरमध्ये गर्दी केली होती. अपेक्षेपेक्षा जास्त मोठा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाचे नाव होते ‘आंखें’.
ज्यांनी आपल्याला सर्वांना रामायण आणि महाभारत दाखवले त्यांनीच ही कमाल करून दाखवली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माता रामानंद सागर होते. या चित्रपटात धर्मेंद्र आणि माला सिन्हा मुख्य भूमिकेत दिसले. परंतु हा चित्रपट धर्मेंद्रला मिळण्याआधी दिग्गज अभिनेता राजकुमार यांना देण्यात आला होता, परंतु त्यांनी ही ऑफर फेटाळून लावली होती.
या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दिग्दर्शक रामानंद सागर आणि अभिनेते राजकुमार यांच्यात खूप चांगली मैत्री होती. दोघांनी 'जिंदगी' आणि ‘पैगाम’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केले होते. रामानंद सागर यांची पहिली पसंती राजकुमार यांनाच होती. आणि मित्र म्हणूनही त्यांना विश्वास होता की, आपली ही ऑफर राजकुमार नाकारणार नाहीत. म्हणूनच जेव्हा रामानंद सागर यांनी आंखें’ हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी सर्वात आधी राजकुमारला प्राधान्य दिले.
राजकुमार यांना आजही आपण कडक आणि राकट आवाजासाठी ओळखतो. एवढेच नाही तर दमदार डायलॉग डिलीवरीसाठीही आपण त्यांना ओळखतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातही राजकुमार एकदम तसेच राजेशाही वागायचे. मात्र रामानंद सागर यांना कधीच असे वाटले नव्हते की, आपला जवळचा मित्र आपले ऐकणार नाही.
या चित्रपटाची ऑफर घेऊन रामानंद सागर थेट राजकुमार यांच्या घरी गेले. चहापाणी झाल्यावर रामानंद सागर यांनी मूळ मुद्द्याला हात घातला आणि स्क्रिप्ट ऐकवली. आणि सांगितले की, या चित्रपटात तुला प्रमुख भूमिका करायची आहे. तसेच ‘10 लाख रुपये अॅाडव्हान्स देईल’ असेही सांगितले.
मात्र किस्सा असा होता की, या चित्रपटाची स्क्रिप्ट राजकुमार यांनी आवडलेली नव्हती. आणि थेट नकार देणे शक्य नव्हते. तसेही राजकुमार आपल्या राजेशाही शैलीसाठी प्रसिद्ध होतेच. त्याकाळी इंडस्ट्रीतील काही लोक राजकुमार यांच्या राजेशाही थाटाला ‘माज करणे’ असे म्हणायचे.
राजकुमार यांना काय लहर आली कुणास ठाऊक... त्यांनी आपल्या घरातील आवडत्या कुत्र्याला ते ज्या रूममध्ये बसले होते, तिथे बोलावून घेतले. रामानंद सागर यांना पुन्हा शॉर्टमध्ये स्क्रिप्ट सांगायला लावली. तोपर्यंत राजकुमार निवांत सिगार पीत बसले होते.
आता मात्र रामानंद सागर भडकले होते. तेवढ्यात राजकुमार यांनी आपल्या घरातील कुत्र्याला विचारले की, क्या कहते हो रामानंद की फ़िल्म की जाए या नहीं? यावर त्या कुत्र्याने काही प्रतिक्रिया दिली नाही.
तो कुत्रा शांतपणे राजकुमार यांच्या पायाशी येऊन बसला.
यावर राजकुमार यांनी म्हटले की, हमारे डॉगी को भी आपकी स्क्रिप्ट पसंद नहीं आई. ऐसे में तो हां कहने का सवाल ही नहीं उठता.
यानंतर रामानंद सागर नाराजीने तेथून उठले आणि आपल्या घराचा रस्ता पकडला. मात्र यावेळी त्यांना झालेला अपमान सहन झालेला नव्हता. त्यांना असे वाटले होते की, नाही म्हणायचे होते तर स्वतः सांगायचे. कुत्र्याला विचारून सांगायची गरज नव्हती. हीच बाब रामानंद सागर यांना रुचली नाही.
यानंतर रामानंद सागर यांनी पुढे कधीच राजकुमार यांच्यासोबत काम केले नाही. तसेच त्यांच्या मैत्रीतही या किस्स्यानंतर दुरावा आला.
असो... जर राजकुमारने ती ऑफर नाकारली नसती तर आपण राजकुमार यांना ‘आंखे’ या चित्रपटात पाहू शकलो असतो. तसेच आज आपण ‘आंखे’ बघता ‘धरमपाजी’ ऐवजी ‘राजकुमार’ यांच्या अभिनयाचे कौतुक करत बसलो असतो.
लेखक : विनोद सूर्यवंशी
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन | लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS