‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन...
‘ठाकुर तो गियो’ म्हणत मुन्शीजी आजही अनेक लोकांना आठवतात. अजूनही या डायलॉगवर मिम्स बनत असतात. मात्र अमराठी लोकांना माहिती नसेल की, करण अर्जुन पुन्हा आल्यावर सातत्याने ‘ठाकुर तो गियो’ हा डायलॉग मारणारे मुन्शी म्हणजे अशोक सराफ यांनी मराठी कॉमेडीचा एक बेंचमार्क सेट केला आहे.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्षा यांनी मराठी फिल्म इंडस्ट्रीवर तब्बल दीड दशक राज्य केलेलं आहे.
‘व्याख्या, विक्खी, वुख्यू’, ‘हा माझा बायको पार्वती’, ‘सत्तर रुपये वारले’, असे अनेक डायलॉग अजरामर करणारे अशोक सराफ हे आजही मराठी कॉमेडीचे किंग आहेत. विचार करा, एक असा माणूस, ज्याची ढेरी सुटलेली आहे, त्याच्या छातीवर केसांचे मोहोळ असताना तो वरच्या 3 गुंड्या उघड्या ठेवतो आणि हिरोसारखा गुळगुळीत, चिकनाचोपडा चेहरा नसलेला माणूस तब्बल 15 वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य करतो, हे अशक्य वाटणारं आहे आणि म्हणूनच अशोक सराफ कॉमेडीचा किंग आहे.
मराठी सिनेमात मोठी उंची गाठलेल्या अशोक सराफ यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले मात्र हिंदीतील लोकांनी त्यांची प्रतिभा ओळखली नाही, अशी ओरड कायमच आपण ऐकलेली आहे. अगदी अनेक बड्या लोकांनीही ‘हिंदीत अशोक सराफ यांना त्यांच्या दर्जाचे काम मिळाले नाही’, असे म्हटलेले आहे. मॉडर्न कबुतर, द लल्लनटोप या वेबसाईटवरही अशोक सराफ यांना हिंदी चित्रपटांनी ‘न्याय’ दिला नसल्याचे म्हटले गेले.
हिंदी चित्रपटात अशोक सराफ यांनी ज्या भूमिका केल्या त्याचे त्यांनी सोने करून दाखवलं.
‘करन अर्जुन’ मधील मुंशी जी, ‘यस बॉस’ मधील शाहरुख खानचा मित्र, ‘सिंघम’ मधील हेड कांस्टेबल असेल किंवा ‘जोरू का गुलाम’ मधील गोविंदाचा मामा असेल. त्यांची प्रत्येक भूमिका भाव खाऊन जायची. मामा वरून लक्षात आलं की, सगळी इंडस्ट्री आजही अशोक सराफ यांना ‘अशोक मामा’ म्हणते, त्यामागेही एक भारी किस्सा आहे.
सत्तरच्या दशकात एक चित्रपटाच्या कामासाठी अशोक सराफ कोल्हापुरमध्ये शुटींग करत होते. तिथे त्या चित्रपटाचे कॅमेरामन प्रकाश शिंदे होते. त्यावेळी प्रकाश शिंदे हे आपल्या छोट्या मुलीला घेऊन सेटवर यायचे. आणि मग प्रत्येकाची ओळख करून देताना त्यांनी अशोक सराफ यांची ओळख ‘अशोक मामा’ अशी करून दिली.
मग ती मुलगी कायम सेटवर आली की, ‘अशोक मामा’ अशी हाक मारायची. काही दिवसांनी ते कॅमेरामन प्रकाश शिंदे हेही चेष्टेत अशोक सराफ यांना ‘अशोकमामा’ म्हणू लागले. हळूहळू संपूर्ण चित्रपटाची टीमही त्यांना ‘अशोकमामा’ म्हणू लागली आणि मग पुढे काही महिन्यांमधेच जवळपास अख्खी इंडस्ट्रीच त्यांना ‘अशोकमामा’म्हणू लागली.
80चे संपूर्ण दशक आणि 90च्या दशकातील काही वर्षे अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टी एकहाती चालवली. आजही या दोघांचे कॉमेडी आणि टायमिंग यांच्या आसपास जाणे, अनेकांना शक्य झालेले नाही. ‘अशी ही बनवा बनवी’, ‘गंमत-जंमत’, ‘धूम धड़ाका’, ‘एकापेक्षा एक’ सारख्या चित्रपट बघितल्यावर आजही वाटतं की, त्यांच्यासारखे तेच होते, पुन्हा कोणीच होऊ शकलं नाही. हे दोघे ज्या चित्रपटात एकत्र काम करतील, तो चित्रपट नक्कीच हिट होणार, याची निर्मात्यांना खात्री असायची.
हिंदीत शाहरुख़-काजोल किंवा अमिताभ-रेखा या जोड्यांना जेवढी पसंती मिळाली तेवढीच पसंती रंजना आणि अशोक सराफ यांच्या जोडीला मिळाली. दोघांची पण कॉमेडी अभिनेता आणि अभिनेत्री अशी ओळख असतानाही त्यांनी रोमांटिक जोडीची ओळखही निर्माण केली. खरं तर हे खूप अवघड काम होतं मात्र या जोडीने ते करून दाखवलं. ‘अश्विनी ये ना’ हे गाणं तर त्याकाळी इतकं भन्नाट झालं होतं की, इतक्या वर्षानंतर आजही हे गाणं प्रत्येक मराठी माणूस कधी न कधी गुणगुणत असतोच. विशेष बाब म्हणजे हे गाणं किशोर दा यांनी गायलेलं आहे, हे अनेकांना माहिती नाही.
नंतरच्या काळात अशोक सराफ यांनी निवेदिता जोशी यांच्यासोबत अनेक चित्रपट केले आणि पुढे ही पडद्यावरची जोडी खऱ्या आयुष्यातही आली.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS