मनोज वाजपेयी बॉलीवूडच्या अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्यांनी थिएटरपासून सुरुवात केली आणि सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीत आपलं...
मनोज वाजपेयी बॉलीवूडच्या अशा स्टार्सपैकी एक आहे, ज्यांनी थिएटरपासून सुरुवात केली आणि सिनेमाच्या मोठ्या पडद्यावर तसेच बॉलीवूड इंडस्ट्रीत आपलं वेगळं आणि विशेष स्थान निर्माण केलं. मनोज वाजपेयी यांना अभिनयाच्या जगात प्रतिभेचे ‘पॉवर हाऊस’ मानले जाते. ते एक असे अभिनेते आहेत जे आपल्या सिनेमातील पात्राला ‘जिवंत’ करण्यासाठी खऱ्या आयुष्यातही ते पात्र जगतात.
मनोज यांनी आता या क्षेत्रात 25 वर्षे पूर्ण झाली. 'सत्या', 'शूल', 'स्पेशल 26', 'गैंग्स ऑफ़ वासेपुर', 'राजनीति', 'पिंजर', 'अलीगढ़' असे सुपरहिट चित्रपट त्यांनी दिले. मात्र बाहेरून येऊन मुंबईत आपले स्वप्न साकार करणे, हा काही सहजसोपा खेळ नव्हता. मुंबईत आल्यावर बरीच वर्षे त्यांना काही काम मिळत नव्हते. एवढेच काय तर अशीही वेळ बऱ्याचदा आली की, जेव्हा त्यांच्याकडे जेवणासाठीही पैसे नसायचे.
मनोज यांनी आपल्या अद्भुत अभिनयाने कायमच टाळ्या मिळवल्या. सत्याचे भिखू म्हात्रे, गँग्स ऑफ वासेपुरचा सरदार खान, शुलचे इन्स्पेक्टर समर प्रताप सिंह, फॅमिली मॅनचे श्रीकांत तिवारी अशा पात्रांनी त्यांच्या कामाची उंची वाढवली.
मात्र एक काळ असाही होता, जेव्हा मनोज वाजपेयी आत्महत्या करण्याचा विचार करत होते. मात्र हे विचार त्यांच्या मनात का आणि कशामुळे यायचे?, याविषयी त्यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला आहे.
ही त्या दिवसांची गोष्ट आहे जेव्हा बिहार आणि नेपाळच्या सीमेवर असणाऱ्या एका छोट्याश्या खेड्यातील एक मुलगा पिक्चरमध्ये काम करण्याचा विचार करत होता. चंपारण जिल्ह्यातील बेलवा गावातील हा मुलगा दुसरा कोणी नसून मनोज वाजपेयी होता. अवघ्या 17 वर्षाचा हा मुलगा घरखर्च चालविण्यासाठी एका शाळेत शिकवायचा.
त्याकाळी पेपर आणि साप्ताहिकामध्ये अनेक बड्या बड्या अभिनेत्यांचे लेख यायचे. मनोज वाजपेयी हे लेख मोठ्या आवडीने आणि सवडीने नेहमीच वाचायचा. नसीरुद्दीन शाह आणि राज बब्बर यांच्या अनेक मुलाखती पाहून मनोजला पिक्चरमध्ये काम करण्याची प्रेरणा मिळू लागली.
त्याच काळात त्यांना एनएसडी म्हणजेच ‘नॅशनल स्कूल ऑफ़ ड्रामा’विषयी माहिती मिळाली. मग त्यांनी सिनेमात काम करण्यासाठी दिल्लीकडे प्रस्थान केले. तिथे त्यांनी एनएसडीत प्रवेश मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले मात्र ते यशस्वी झाले नाहीत. तब्बल 4 वेळा ते एनएसडीची परीक्षा नापास झाले. आणि याच काळात त्यांना नकारात्मक विचारांनी घेरले. यावेळी त्यांचे मन इतके तुटले की, त्यांना अनेकदा आत्महत्या करावीशी वाटत होती. हा काळ इतका निराशेचा होता की, मनोज यांच्या मनात सतत आत्महत्येचे विचार चालू असायचे. याच काळात कुणीतरी त्यांना एनएसडीची विषय सोडून देण्याचे सुचवले. तसेच त्यांना ‘नुकड़ नाटक’ करण्याचा सल्ला दिला.
मग मनोज त्या विचारांपासून थोडे बाजूला झाले. त्यांना नुकड नाटक हा खूपच चांगला पर्याय वाटला. त्यात त्यांचे खूपच मन रमू लागले. या कामामुळे ते अधिक समाधानी झाले परिणामी ते सकारात्मक विचारांकडे वळले. आता त्यांच्या मनातून आत्महत्येचे विचार दूर जाऊ लागले. यानंतर ते अलीगढ़ यूनिवर्सिटी मध्ये ग्रेजुएशनचे शिक्षण घेण्यासाठी गेले.
इथे त्यांची ओळख फ़ेमस डायरेक्टर अनुभव सिन्हा यांच्याशी झाली. अनुभव सिन्हा यांच्या एका नाटकात त्यांनी काम केले होते. त्याचवेळी अनुभव यांनी ओळखले की, मनोज मध्ये अभिनयाची कोणतीही कमी नाही.
म्हणूनच अनुभव पुन्हा मुंबईला गेल्यावर त्यांनी तिकिट पाठवून मनोजला मुंबईत येण्यास सांगितले. मुंबईत पोहोचल्यावर अनुभव यांनी मनोजची ओळख एका दिग्दर्शकाशी करून दिली. एका सिरीयलसाठी मनोज यांची निवड झाली होती, पण नंतर काही कारणांमुळे ही भूमिका दुसर्याच अभिनेत्याला देण्यात आली.
यानंतर मनोज पुन्हा नाराज झाले. मात्र आता आलो आहोत तर काहीतरी करूनच दाखवणार, या विचारांनी त्यांना प्रेरित केले. मग त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष केला.
गोविंद निहलानी यांच्या 'द्रोहकाल' या चित्रपटात त्याने छोटी भूमिका केली होती. शेखर कपूरच्या बॅन्डिट क्विन मधील त्याच्या अभिनयाचे कौतुक झाले. पण 1998 साली रिलीज झालेल्या ‘सत्या’ या चित्रपटाकडून त्याला खरी ओळख मिळाली. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्कृष्ट सपोर्टिंग अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आणि त्यांच्या पुढच्या प्रवासाची कहाणी तर सर्वांनाच ठाऊक आहे.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS