आजकालचा जमाना बदलला आहे. कलाकार जेव्हा कविता, गाणी, सिनेमे आणि माध्यमांशी सबंधित इतर गोष्टी बनवत असतात. तेव्हा त्यावर वाद होणार हे निश्चित अ...
आजकालचा जमाना बदलला आहे. कलाकार जेव्हा कविता, गाणी, सिनेमे आणि माध्यमांशी सबंधित इतर गोष्टी बनवत असतात. तेव्हा त्यावर वाद होणार हे निश्चित असतं. कारण आपल्याकडे सध्या ‘भावना’ दुखावण्याचे प्रमाण बरेच वाढले आहे.
कधी कधी या भावना सिनेमाचे निर्माते पण बळच दुखावतात कारण त्यांना तो वाद निर्माण करायचा असतो. मात्र कधी कधी चांगल्या कलाकृतीला विनाकारण वादाला सामोरे जावे लागते, कारण आपल्या भावना स्वस्त झालेल्या आहेत. इतिहास, व्यंग आणि कॉमेडी यापलीकडे जाऊन लोकांच्या भावना कशानेच दुखत नाहीत. सध्या राजकारणात आणि बॉलीवूडमध्ये भावना दुखणे, हा प्रकार फोफावताना दिसत आहे.
इतिहास खरोखर चुकीचा दाखवला गेला तर आंदोलने करणे रास्त आहे मात्र फक्त आपल्या काही ठराविक स्वार्थासाठी काहीतरी वाद उकरून काढणे, हे सर्वाथाने धोकादायक आहे. त्याचे परिणाम भविष्यात दिसत असतात.
युपी, बिहार तशी गरीब आणि गुन्हेगारीने बरबटलेली राज्य आहेत. आता कदाचित हे वाक्य वाचूनही एखाद्याच्या भावना दुखावतील आणि तो आमच्यावर केस ठोकेन. मात्र हे खरंही आहे. आज जशा लोकांच्या भावना कशावरूनही दुखतात तशा तेव्हाही दुखायच्या. फक्त त्यात एक छोटा फरक होता, तो म्हणजे तेव्हा भावना खरोखर दुखायच्या. एक काळ होता युपी, बिहार साईडचा एक हिरो बॉलीवूडवर राज्य करत होता. नाव ‘गोविंदा’.
1996 मध्ये गोविंदा जोमात असताना त्याला एका गाण्याने अडचणीत आणले होते. ‘एक चुम्मा तू मुझको उधार दई दे…चाहे बदले में यूपी बिहार लई ले’या ‘छोटे सरकार’ सिनेमातील गाण्याने गोविंदा आणि शिल्पा शेट्टी मोठ्या अडचणीत आले होते. ती अडचण तब्बल 23 वर्षांनी दूर झाली.
‘एक चुम्मा तू मुझको उधार दई दे…चाहे बदले में यूपी बिहार लई ले’ हे गाणं त्यावेळी प्रचंड गाजलं. आधी लोकांनी हे गाणं एन्जॉय केलं आणि नंतर जे घडलं ते आक्रीत होतं. या गाण्यापेक्षा त्यानंतर सुरु झालेला वाद जास्त गाजला. कदाचित या गाण्यामुळे गोविंदा आणि शिल्पा शेट्टीचं करियर डब्यात जाण्याची शक्यता त्यावेळी व्यक्त केली जात होती.
1997 मध्येझारखंडमध्ये असलेल्या पाकुड़ सीजेएम कोर्टात गोविंदा आणि शिल्पा शेट्टीच्या विरोधात केस दाखल झाली. हे गाणं अश्लील आहे आणि या गाण्यामुळे बिहार-यूपीचा अपमान झाला आहे, अशी ही तक्रार होती.
आता बिहार-यूपीच्या लोकांनी ज्या गाण्यावर मोक्कार डान्स केला होता त्याच गाण्याच्या विरोधात बिहार-यूपीचे लोक उभा झाले होते. ही केस केली होती, मोहिनी मोहन तिवारी यांनी.
झालं... हे प्रकरण कोर्टाने सिरीयस घेतलं आणि गोविंदा, शिल्पाला सेक्शन 294 (अश्लीलता) आणि सेक्शन 500 (अपमान) च्या अंतर्गत नोटीस जारी करण्यात आली. आता गोविंदा आणि शिल्पाला कोर्टात हजर राहावे लागणार होते, मात्र त्याआधी एक भारी प्रकार घडला.
कोर्टाने पाठवलेल्या नोटीसा दुसऱ्याच ठिकाणी गेल्या. योग्य ठिकाणी नोटीस न गेल्याने गोविंदा आणि शिल्पाची कोर्टाची वारी तर टळली होती. कारण त्यांना नोटीस पोहोच झाली नसल्याने त्यांना कोर्टात जाण्याची गरज नव्हती.
आता गोविंदा आणि शिल्पाला वाटलं आपण सुटलो. मात्र मेन विषय तर नंतर झाला. कोर्टाने नंतर त्यांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ लावत नॉन बेलेबल वारंट जारी केले. नॉन बेलेबल वारंट म्हणजे ज्यात जमानत होत नाही.
विशेष बाब म्हणजे यावेळची नोटीस मात्र योग्य पत्त्यावर गेली. आता झक मारून गोविंदा आणि शिल्पाला या प्रकरणाला सामोरे जाणे, भाग होते. 2001 मध्ये दोघेही हाय कोर्टात गेले. आणि तिथे त्यांनी ही कारवाई थांबविण्यासाठी विनंती केली.
अजून एक महत्वाची बाब म्हणजे कोर्टाची ही नोटीस योग्य पत्त्यावर जायला 4 वर्षे लागली आणि या प्रकरणाचा निर्णय येण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली.
नंतर हा खटला संपला. गोविंदा आणि शिल्पा ‘बाइज्जत बरी’ झाले. मात्र बॉलीवूडने नंतरच्या काळात भन्नाट गाणी काढली आणि भावना दुखावणाऱ्या लोकांचा पद्धतशीर गेम करत बदला घेतला.
‘लैला तेरी ले लेगी’, ‘भाग भाग डी के बोस डी के बोस डी के बोस’ , ‘कुंडी मत खड़काओ राजा’, अशी गाणी आली आणि लोक पुन्हा नाचू लागले.
जस्टिस अमिताभ गुप्ता यांनी त्यावेळी कोर्टात स्पष्ट केलं की, सिनेमोटोग्राफी एक्ट, 1952 अंतर्गत हा खटला फिल्म स्टार वर चालू शकत नाही. अशा वादात त्यांच्यावर सामान्य नियम लागू होत नाहीत. अर्थात कोर्टाला या गाण्यात खरोखर काही अश्लीलता किंवा अपमान आहे का? हे शोधण्यासाठी तब्बल 23 वर्षे लागली. आणि ‘चुम्मा’प्रकरण अशा प्रकारे संपलं.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS