‘काबिलियत हो तो कामयाबी झक्क मार के पीछे आएगी’ असा डायलॉग आमीर खानने ‘थ्री इडियटस’ मध्ये मारला आणि अनेकांनी नोकऱ्या सोडल्या, उद्योगाकडे वाट ...
‘काबिलियत हो तो कामयाबी झक्क मार के पीछे आएगी’ असा डायलॉग आमीर खानने ‘थ्री इडियटस’ मध्ये मारला आणि अनेकांनी नोकऱ्या सोडल्या, उद्योगाकडे वाट वळवली. काहींनी तर थेट समाजसेवेचा वसा आपल्या खांद्यावर घेतला. प्रत्येकाने आपापल्या आवडत्या क्षेत्रात पाय रोवण्याचे ठरवले आणि यामागची प्रेरणा होता ‘थ्री इडियटस’ हा सिनेमा आणि त्यातील ‘काबिलियत हो तो कामयाबी झक्क मार के पीछे आएगी’ हा आणि असे अनेक डायलॉग.
नंतरच्या काळात काही लोक यशस्वी झाले तर काही मागे राहिले. मात्र या चित्रपटाने लोकांना एक दृष्टीकोन दिला... मनासारखे म्हणजेच मनसोक्त जगण्याच्या.
मात्र आज आम्ही जी स्टोरी सांगणार आहोत. तीही एका कुठल्याही बाजूने हिरो मटेरियल नसणाऱ्या एका नायकाची. जो सध्या तरुणाईसह बॉलीवूडच्या सुपरस्टार मंडळींच्याही गळ्यातील ताईत बनला आहे. गावाकडून आलेला एक माणूस... ज्याने खरोखर कष्ट तर केलेच जे सगळ्यांना करावे लागतात मात्र त्याचा संघर्ष मोठा होता. घरच्यांच्या स्वप्नांना माती दाखवणारा होता. याच नायकाने बिहारच्या खेडेगावातून मुंबईत येत (कुठलाही गॉडफादर नसताना) सिद्ध करून दाखवले की, काबील बनो, काबिलियत हो तो कामयाबी झक्क मार के पीछे आएगी.
काही वर्षांपूर्वी सिनेमाने भारतात 100 वर्षे पूर्ण केली किंवा भारतीय सिनेमाने शंभर वर्ष पूर्ण केली, असेही म्हणू शकतो. 'राजा हरिश्चंद्र' आणि 'लैला-मजनू' या पौराणिक कथांनी भारतीय सिनेमाची सुरुवात झाली. याबरोबरच भारतात सिनेमा जसा पाय पसरवू लागला तसतसे त्यात सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंधित असणारे विषय समोर येऊ लागले.
‘पौराणिक’ सिनेमांचा काळ संपला आणि सुरु झाला ‘लव्हस्टोरीज’चा काळ. ज्यात हिरो किंवा हिरोईन गरीब असायचे आणि आपले प्रेम मिळवण्यासाठी ते झगडायचे. हळूहळू त्यात ‘फायटिंग’चीही भर पडली.
हळूहळू मुंबई सिनेमाचे केंद्रस्थान बनली. सुरुवातीच्या काळातील दिग्दर्शकांना आणि समाजालाही ‘अभिनय’ या गोष्टीचे फारसे वावडे नसले तरी 90 नंतर समाजाने अभिनयक्षम हिरोंना स्वीकारण्यास सुरुवात केली. (अर्थात समाजानेही नायकाची किमान क्षमता पाहिली म्हणूनच तर आजही सलमानसारख्या हिरोंच्या नावावर फिल्म चालते)
सिनेमात काम करायला मिळावे म्हणून 90च्या दशकापासून देशभरातून तरुण, तरुणींचे जथ्थे मुंबईकडे रवाना झाले. आजही हे जथ्थे मुंबई, दिल्लीकडे जातच असतात. या स्ट्रगलर पोरांमध्ये कितीतरी असे असतात की, जे एकदम छोट्याश्या गावचे असतात. अनेक असेही असतात जे घरच्यांचा, नातेवाईकांचा विरोध घेऊन आणि कुटुंबाच्या स्वप्नांना तिलांजली देऊन आलेले असतात. काही तर अभिनेता/अभिनेत्री होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रेमाची कुर्बानी देऊन आलेले असतात. ते इकडे येतात आणि तिकडे त्यांच्या जोडीदाराचे शुभमंगल सावधान झालेले असते. अशाच स्ट्रगलर पोरांपैकी एक होता ‘पंकज त्रिपाठी’.
पंकज यांचा जन्म बिहारच्या गोपाळगंजमधील शेतकरी कुटुंबात झाला. पंकजच्या बालपणात, त्याच्या वडिलांना वाटायचे की, आपल्या मुलानेही शिकवून, अभ्यास करून मोठा डॉक्टर व्हावे. आपला मुलगाही पाटणासारख्या मोठ्या शहरात राहिला पाहिजे आणि त्याने आपल्या कुटूंबाचे नाव उज्वल करावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र हे जग त्याच्या वडिलांचे होते. पंकज यांचे जग वेगळेच होते.
पंकज यांना लहानपणी अभ्यास करायला आवडत नव्हते. त्यांचे मन फक्त नाटकात लागायचे. त्यांना अभिनयाचे वेडाने पछाडले होते. इतके किम आपल्याच गावात ते स्री-भूमिका करायचे. मात्र वडिलांनी त्यावेळी चांगल्या अभ्यासासाठी पंकजला दूर पाठवायचे ठरवले. अभ्यासासाठी गाव सोडल्यानंतर पंकजची ही आवडही मागे राहिली. मात्र महाविद्यालयात गेल्यावर त्यांना पुन्हा अभिनय करायची संधी मिळाली. ते पण गावासारखे मोकळ्या पटांगणात नाही तर थेट थियेटरमध्ये.
थिएटरमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी स्वत:ला आणि स्वतःतल्या नायकाला शोधायला सुरुवात केली. अनेक छोटी-मोठी नाटकं केली. थिएटर करत असताना, पंकजला एनएसडी(नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) विषयी माहिती मिळाली. मात्र त्यासाठी 15 वी पास असण्याची अट होती. पंकज याने 12 वी झाल्यावर शिक्षण सोडले होते. फक्त एनएसडीमध्ये प्रवेश मिळवायचा म्हणून पंकज यांनी पुन्हा शिक्षण सुरु केले. पुन्हा 3 वर्षानंतर पंकज यांनी एनएसडीची प्रवेश परीक्षा दिली. दरवर्षी हजारो मुले ही परीक्षा देतात. आपला दमदार अभिनय आणि या क्षेत्रातील ज्ञानाच्या जीवावर अखेर पंकज यांनी एनएसडीत प्रवेश मिळाला. मात्र त्यांनी मधल्या काळात त्यासाठी 3 वर्ष पुन्हा नवा शिक्षणाचा संघर्ष केला होता.
अभिनयातील सर्व महत्वाचे ज्ञान पंकज यांनी एनएसडीत शिकून घेतले. एनएसडी सोडल्यानंतर पंकज पुन्हा पाटण्यात गेले आणि एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाले. येथे 4 महिने काम केल्यावर त्यांनी काही मोठी स्वप्ने पाहत मुंबईची वाट धरली. मात्र मुंबईत आल्यावर त्यांनी जे बघितले, ते अगदीच उलटे होते. त्यांना वाटायचे, इथे अभिनय पाहिला जातो मात्र इथे ओळखी जास्त महत्वाच्या ठरतात, हेही लक्षात आले.
दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या ऑफिसबाहेर लागलेल्या अभिनेत्यांच्या लाईनीच्या लाईनी पाहून ते स्वतःला कमी समजू लागले. कारण ते दिसायला आणि राहायला साधे होते. एवढेच नाही तर त्यांचा चेहराही अगदीच सामान्य होता.
चेहरा सामान्य असला तरी त्यांचा हौसला बुलंद होता. त्यामुळेच ते मागे हटले नाहीत. त्यांनी सतत प्रयत्न केले आणि चित्रपट, मालिका , जाहिराती अशा सर्वच गोष्टींसाठी ऑडिशन दिल्या. आणि नंतर त्यांना काही चित्रपटात किरकोळ कामे मिळाली. ज्यात त्यांचा कुठे चेहराही व्यवस्थित दिसला नाही. मात्र या कामांमुळे त्यांचे मित्र बनत गेले आणि किरकोळ कामांवरून त्यांना साधी कामे मिळायला लागली.
याच दरम्यान त्यांना कळले की, अनुराग कश्यप आता 'गैंग्स ऑफ़ वासेपुर' करत आहे. मग पंकज तिकडे ऑडीशन देण्यासाठी गेले. तिथे कॉस्टिंग डायरेक्टर मनीष छाबराची नजर पंकजवर पडली. आणि पंकजला ‘सुल्तान मिर्ज़ा’चे पात्र करण्यास सांगितले. पंकज यांनी हे पात्र इतके जबरदस्त केले की, अनुरागपासून सगळी इंडस्ट्री त्यांचे कौतुक करू लागली. या पात्राने त्यांना बॉलीवूडच्या जगात नवी ओळख दिली. आणि याच अभिनयाच्या जीवावर पंकजसाठी बॉलीवूडचे दरवाजे उघडले.
त्यानंतर पंकज यांनी 'फुकरे', 'नील बट्टे सन्नाटा', 'बरेली की बर्फी' यासारखे अनेक बॉलिवूड चित्रपट तसेच 'मसान' आणि 'मांझी' सारखे आर्ट फिल्मही केल्या.
आज पंकज हे बॉलिवूडमध्ये एक असे नाव बनले आहे, ज्यांना फक्त प्युअर आणि दमदार अभिनयासाठी ओळखले जाते. बॉलिवूड व्यतिरिक्त पंकज यंदा तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडण्याची तयारी करत आहे.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS