‘मोरया मोरया’, ‘लल्लाटी भंडार’, ‘ये गो ये मैना’ अशी गाणी जेव्हा लागायची, तेव्हा मराठी पोरं धुमशान नाचायची. हळूहळू या गायक संगीतकार जोडीचं ना...
‘मोरया मोरया’, ‘लल्लाटी भंडार’, ‘ये गो ये मैना’ अशी गाणी जेव्हा लागायची, तेव्हा मराठी पोरं धुमशान नाचायची. हळूहळू या गायक संगीतकार जोडीचं नाव पुढं येऊ लागलं. आणि मग अजय अतुल म्हटलं की, लोकं बेभान होऊन, देहभान हरपून त्यांची गाणी ऐकायची.
मग त्यांनी सैराट, लई भारी, नटरंग, जाऊ द्या ना बाळासाहेब असे सिनेमे करता करता थेट हिंदी सिनेमाला हात घातला आणि मग अजय अतुल हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर अवघ्या देशाचे झाले.
आधी अजय अतुल यांची गाणी लागली की, मराठी मानसं येडी होऊन नाचायची. आता देशातील मानसं येडी होऊन नाचतात. मोरया मोरया, खेळ मांडला, पासून तर चिकणी चमेली, अभी मुझमे कही अशी विविध टोकाची गाणी त्यांनी दिली.
देवाचे अभंगात तल्लीन करणारी आणि नाचता न येणाऱ्या माणसालाही कंबर हलवायला लावतील, अशा गाण्यांने ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अजय अतुल यांच्या एका मराठी गाण्याने जे करून दाखवले आहे ते आजवर कुणालाच करता आलेले नाही.
2009 मध्ये एक मास्टरपीस सिनेमा आला ‘जोगवा’. हा चित्रपट जेव्हा लोकांसमोर आला तेव्हा लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर उचलून घेतलं. त्यातही हा प्रादेशिक भाषेतील म्हणजे मराठी भाषेतील चित्रपट असला तरीही देशभरात या चित्रपटाचं कौतुक झालं. देशातील आघाडीच्या समीक्षकांनीही या चित्रपटाला ‘फाईव्ह स्टार रेटिंग’ दिलं. आणि या चित्रपटाने म्हणजेच अजय अतुलने जगाला एक असं गाणं दिलं, ज्याने इतिहास घडवला.
अंधश्रद्धा, देवदासी प्रथा, निरक्षरता, लैंगिकता, समलैंगिकता, सामाजिक अन्याय, दलित समाज खात असलेल्या खस्ता आणि त्यांचे हाल... हे सगळं जोगवा मध्ये दाखवून खरं तर दिग्दर्शकांने लहान तोंडी मोठा घास घेतला होता. ‘जोगवा’ पाहताना माणूस विचलित होतो मात्र तेव्हाच त्याला हिम्मतही मिळते. आणि अंगावर कट तर तेव्हा येतो जेव्हा हे गाणं समोर येतं....
जीव दंगला, गुंगला, रंगला असा, पिरमाची आस तू
जीव लागला, लाभला, ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू
पैल तीरा नेशील, साथ मला देशील, काळीज माझं तू
सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवेचा चांद तू
या मराठी गाण्याने इतिहास केला आहे. या गाण्याला आणि चित्रपटाला अजय अतुलने संगीत दिलं आहे. याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या गाण्याला एकूण 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. आणि या चित्रपटाला 2 पुरस्कार मिळाले. म्हणजे एकूण 5 पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.
एक बेस्ट फिल्म आणि एक बेस्ट एक्टरचा पुरस्कार चित्रपटाला. बेस्ट म्यूजिक डायरेक्टरचा अवॉर्ड संगीतकार अजय-अतुलला, बेस्ट प्लेबैक सिंगर फीमेलचे अवॉर्ड श्रेया घोशालला आणि बेस्ट प्लेबैक सिंगर मेल अवॉर्ड हरिहरन यांना मिळाले.
एकाच गाण्याला 3 राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याची ही देशात पहिलीच वेळ होती. त्यामुळे या गाण्याने इतिहास रचला. यातही अजून एक विशेष बाब आहे ती म्हणजे, हे मराठी गाणं मराठी भाषाही न बोलता येणाऱ्या गायकांनी गायलेलं आहे. हरिहरन साउथ इंडियाचे आहेत तर श्रेया घोशाल बंगाली आहे. मात्र गाणं ऐकताना तुम्हाला असं कुठेही वाटत नाही की, हे गाणं नॉनमराठी गायकांनी गायलेलं आहे.
आता एक मुद्दा लक्षात घ्या. राष्ट्रीय पुरस्कार आणि इतर जे फिल्म अवार्ड्स असतात यात खूप फरक असतो. देशातील प्रत्येक भाषेतील त्या वर्षातील उत्तम गाणी शोधून, ती परखून त्यातील बेस्ट असलेल्या एका गाण्याला हा राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. हे महाकठीण काम असते. यात स्पर्धा मोठी असते. बॉलीवुडचे जे फिल्म अवार्ड्स ते फक्त बॉलीवुड फिल्म्सला दिले जातात. त्यातही वाशीलाबाजी होते, असे बॉलीवूडच्या अक्षयकुमार, आमीर खान सारख्या हिरोंनी सांगितलेलं आहे.
‘जीव दंगला, गुंगला, रंगला’ हे एक असं गाणं आहे ज्यात विश्वास, आदर, प्रेम आणि जीवनातील प्रवासात कायम साथ देण्याचं वचन आहे. या गाण्यात आपला विश्वास दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रतीकांचा उपयोग केला आहे. या गाण्याने सर्वाथाने इतिहास रचला आहे.
एवढेच नाही तर हा चित्रपट जेव्हा राष्ट्रीय स्तरावर गेला तेव्हा अनेक बड्या हस्तीनी असे म्हटले होते की, हिंदी चित्रपटात काम करणाऱ्या हिरो, हिरोईन, दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी ‘जोगवा’ चित्रपट पाहावा आणि अशी काही तगडी कलाकृती करण्याकडे भर द्यावा.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
COMMENTS