बॉलीवूडमध्ये अनेक मोठमोठे गायक आणि संगीतकार आहेत, जे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत. बॉलीवूडमध्येही कृष्णकुमार कुन्नथ नावाचा एक गाय...
बॉलीवूडमध्ये अनेक मोठमोठे गायक आणि संगीतकार आहेत, जे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आहेत. बॉलीवूडमध्येही कृष्णकुमार कुन्नथ नावाचा एक गायक आहे ज्याचे जगभरात चाहते आहेत. तुम्ही म्हणाल... काहीही खोटं सांगताय... असा कुणी गायकच बॉलीवूडमध्ये नाही.
मात्र जर आम्ही विचारलं की, के.के ला ओळखता का? तर तुमचं उत्तर असेल... अरे तो तर आमचा फेव्हरेट गायक आहे. 'तड़प तड़प के इस दिल से' असो वा 'यारों दोस्ती बड़ी ही हसीन है' हे गाणं असो. कृष्णकुमार कुन्नथ उर्फ़ के. के चं प्रत्येक गाणं आपलं मन जिंकून घेतं. के. के ची जवळपास सर्वच गाणी आपल्याला भिडणारी आणि आपल्या मनाच्या जवळ जाणारी आहेत.
त्यांच्या आवाजातील गोडवा आणि गायनाची रेंज इतकी अफाट आहे त्यामुळेच के. के एक प्रत्येक गाण्याला आइकॉनिक बनवतो.
दिल्लीत वाढलेल्या के.के ने बॉलीवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तब्बल 3500 जिंगल्स गायलेल्या आहेत. पहिल्यांदा 'माउंट सेंट मैरी स्कूल' आणि मग 'किरोड़ीमल कॉलेज'मध्ये आपल्या आवाजाची जादू सगळीकडे पसरवणारे के.के यांचा चाहता वर्ग हळूहळू वाढत होता. त्यांना पहिल्यांदा गायनाची सर्वात मोठी संधी मिळाली ती 1999 साली. त्यावर्षी भारतीय संघासाठी त्यांनी 'Josh of India' हे गाणे गायले होते. याच वर्षी त्यांच्या आवाजातील एक म्युझिक अल्बम रिलीज झाला होता. 'पल' असे त्या अल्बमचे नाव असून या अल्बममधील 'यारो दोस्ती' आणि 'आप की दुआ' या २ गाण्यांनी त्यांना रात्रीत स्टार बनवले.
ही गाणी इतकी लोकप्रिय झाली की, के.के. यांना बॉलीवूडमध्ये अनेक गाण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या.
आजही जेव्हा जेव्हा ‘दोस्ती’ ‘मैत्री’ असे विषय निघतात तेव्हा 'यारो दोस्ती बड़ी ही हसीन है' हे गाणेही आपोआपच मनात येते. आजही या गाण्याला यूथ एंथम (तरुणाईचे गाणे) म्हटले जाते.
शोले चित्रपटातील 'ये दोस्ती' आणि 'यारो दोस्ती बड़ी ही हसीन है' ही २ गाणी लागताच तुटलेली दोस्ती पण जोडली जाऊ शकते. इतकी ताकद या गाण्यांमध्ये आहे.
1999 साली के.के. सलमान खान आणि ऐश्वर्या राय काम करत असलेल्या 'हम दिल दे चुके हैं सनम' या चित्रपटात गाण्याची संधी मिळाली. के.के नेही या गाण्याचे सोने केले. हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की, आजही हे गाणे प्रत्येक ‘सिंगिंग शो’मध्ये म्हटले जाते. या गाण्याला त्याकाळी तरुणाईने अक्षरक्ष: डोक्यावर उचकून घेतले होते. ज्यांना मुली सोडून गेल्या होत्या त्यांना या गाण्याने आधार दिला. प्रेमभंग झालेल्या प्रत्येक व्यक्तीला आजही असे वाटते की, हे गाणे आपल्यासाठीच बनलेले आहे. अशी जादू या गाण्यात आणि के.के. च्या आवाजात होती.
या एका गाण्यामुळे के.के. बॉलीवूडचे मोठा गायक म्हणून ओळखले जाऊ लागले. तेव्हापासून आजपर्यंत के.के. यांनी 'कोई कहे कहता रहे', 'सच कह रहा है दीवाना दिल''आवारापन बंजारापन', 'तू आशिक़ी है', 'बस एक पल', 'सोणिये', 'आशाएं', 'तू ही मेरी शब है', 'अलविदा', 'ओ मेरी जान', 'आंखों में तेरी अजब सी अजब', 'ज़रा सी दिल में दे जगह', 'ख़ुदा जाने' आणि 'तू जो मिला' अशी अनेक सुपरहिट गाणी गायली.
आजवर अनेक गीतकार आणि लेखकांनी असे म्हटले आहे की, के.के. च्या आवाजासाठीच आम्ही अनेक गाणी लिहिली आहेत. 'अलविदा-अलविदा' आणि 'तड़प-तड़प के इस दिल से' ही दोन्ही गाणी के.के. साठीच लिहिली गेली होती. जरा विचार करा, 'तड़प-तड़प' हे गाणे उदित नारायण आणि 'अलविदा-अलविदा' हे गाणे हिमेश रेशमियाने म्हटले असते तर ते खरोखरच एवढे हिट झाले असते का? ही गाणी सुपरहिट होण्यामागे के.के. च्या आवाजाची जादु होती.
फक्त गीतकारच नाही तर विशाल-शेखर सारखे संगीतकारसुद्धा त्यांच्या चित्रपटातील एखादे गाणे फक्त फक्त के.के. च्या आवाजात गाण्यासाठी राखीव ठेवतात. विशाल-शेखर के.के. ला नेहमीच आपला लकी चार्म मानतात. त्याचे कारणही के.के. चा आवाजच आहे.
एवढा मोठा गायक असूनही के.के खूप साधे आयुष्य जगतात. ते कधीच मिडियामध्ये जात नाहीत. ते शक्यतो मिडियापासून दूर असतात. ते कोणत्याही पुरस्कार सोहळ्यातही जात नाहीत. न ते एखाद्या बिझनेसपर्सनच्या मुलांच्या लग्नात गातात. के.के.ची युथ फॅन फॉलोइंग आजही तशीच आहे, जेवढी 20 वर्षांपूर्वी होती. हेच कारण आहे की, लक्षाधीशाच्या कार्यक्रमात गाण्याऐवजी ते कोणत्याही कॉलेजच्या कार्यक्रमात गातात तेही अगदी कमी पैशांत.
आजही बॉलीवूडचे इतर गायक के.के ला अंडररेटेड समजतात. के.के. हे गाताना कधीच मोठमोठे आलाप घेत नाहीत आणि तरीही त्यांच्या गाणी मनावर प्रभाव सोडणारी असतात. म्हणूनच बॉलीवूडच्या इतर गायकांपेक्षा के.के. हे वेगळे ठरतात.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS