आज भौगोलिक क्षेत्रानुसार आपण कलाकारांना वाटून घेतले आहे. काही राजकीय पक्षही यात नको अक्कल लावून कलाकारांना वैश्विक होण्यापासून रोखत आहेत. हा...
आज भौगोलिक क्षेत्रानुसार आपण कलाकारांना वाटून घेतले आहे. काही राजकीय पक्षही यात नको अक्कल लावून कलाकारांना वैश्विक होण्यापासून रोखत आहेत. हा झाला राजकारणाचा आणि सांस्कृतिक राजकारणाचा भाग मात्र या सगळ्या सीमारेषांना आसमान दाखवत एक गायक हयात नसतानाही भारतीयांच्या मनाचा बेताज बादशहा झालेला आहे.
उस्ताद नुसरत फ़तेह अली खान यांची गाणी आजही वेगेवेगळ्या पद्धतीने, नव्या गोष्टींचा वापर करून पुन्हा बनवली जात आहेत. मात्र तरीही भारतीय म्हणतात... वो मजा ही कहा, जो नुसरत सहाब के गाने मै है?
खरंतर आम्हा भारतीयांना पाकिस्तानशी मोठे वावडे आहे. क्रिकेट असो की इतर कुठलेही क्षेत्र आम्ही पाकिस्तानला कायमच कमी लेखतो. मात्र एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कलाकार हे कुठल्या एका भाषेचे, राज्याचे, देशाचे नसतात. ते लोकांचे असतात. मधल्या काळात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत होती. पुढे त्या अनुषंगाने काही घडामोडी घडल्या. हे आज नाही याआधीपासून चालत आलेलं आहे. मात्र पुन्हा एक गोष्ट अत्यंत जाणीवपूर्वक लक्षात घ्यावी लागेल, ती म्हणजे कला आणि कलाकार हे कधीच एका भाषेचे, राज्याचे, देशाचे नसतात.
उस्ताद नुसरत फ़तेह अली खान यांनाही बॉलीवूडमधून निमंत्रणे यायची. मात्र खानसाहेब म्हणायचे की, मी हिंदुस्तानमध्ये आलो तरी एकाच माणसाबरोबर काम करेन तो म्हणजे जावेद अख्तर.
त्यावेळी जावेद अख्तर आणि सलीम खान यांची जोडी खूप फेमस होती. गीत, पटकथा, संवाद अशी सगळी लेखनाची कामे ही मंडळी करायची. तर दुसऱ्या बाजूला प्रेमाच्या पुस्तकाचे पहिले पान वाचता वाचता 'आफ़रीन-आफ़रीन' ऐकणे किंवा प्रेयसी आपल्यापासून दूर गेल्यावर 'सांसों की माला' हे गाणे गुणगुणणे असेल. नुसरत फ़तेह अली ख़ान ही एक अशी असामी आहे की, ज्यांच्या मृत्युनंतरही त्यांची गाणी लोकांच्या मनात गोंधळ घालत असतात.
नुसरत फ़तेह अली ख़ान हे भलेही उशिराने भारतात आले मात्र त्याआधी त्यांचा आवाज भारतात सर्वदूर पसरलेला होता. खानसाहेब भारतावरही खूप प्रेम करायचे. बॉलीवूडच्या निमंत्रणावरून अखेर ते भारतात आले मात्र जावेद अख्तर यांच्यासोबतच काम करण्याची अट ठेवून.
जावेद अख्तर आणि खानसाहेब यांच्या जोडीने भारताला निराश नाही केले. त्यांनी एकत्र येऊन सर्वात आधी एक अल्बम काढला, नाव होते 'संगम'. हा अल्बम प्रचंड प्रसिद्ध झाला. प्रेमात पडलेल्यांना आजही प्रेमात पडायला मजबूर करणारे गाणे 'आफ़रीन-आफ़रीन' या अल्बममध्येच होते.
एवढेच काय तर ‘मेरी आवारगी' सारख्या अतिसुंदर गझलाही या अल्बममध्ये होत्या. यानंतर खानसाहेब थेट बॉलीवूडला भिडले आणि त्यांनी गायलेली काही गाणी आजही काही एकट्यात ऐकली जातात तर काही सार्वजनिक ठिकाणी. ‘तुम्हे दिल्लगी भूल जानी पडेगी’ हे गाणं अनेकांनी एकट्यात ऐकलं असेल. तर 'दूल्हे का सेहरा' हे गाणं आजही बहुतांश लग्नात लावलं जातं.
जावेद यांच्यासोबत काम करून खानसाहेबांनी बॉलीवूड आणि अखंड भारताला, पाकिस्तानला अशी काही गाणी दिली की, जी पुढच्या कित्येक पिढ्या विसरू शकणार नाहीत. त्या गाण्यातील प्रेम, दुःख, राग आणि विश्वास कायम टिकून राहील. त्यांची जावेद यांच्यासोबत काम करण्याची अट सर्वांसाठी चांगलीच ठरली.
या आपल्या मोहमायेत गुरफटलेल्या दुनियेला त्यांनी एकदिवशी अलविदा केला. मात्र जाताना त्यांनी अजून एका जादुई व्यक्ती आपल्याला दिली ते म्हणजे त्यांचा मुलगा राहत फ़तेह अली ख़ान.
राहत फ़तेह अली ख़ान आज त्यांच्या वडिलांची पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. वडिलांनी दिलेला कलेचा वारसा त्यांनी अतिशय तन्मयतेने आणि उत्कृष्ट पद्धतीने पुढे चालवला आहे. आजही जुने लोक आणि सिनेमाची चाहती मंडळी जावेद आणि खानसाहेब यांच्या जोडीला मिस करतात.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS