एक हात कंबरेवर, दुसरा हात भन्नाट स्टाईलमध्ये फिरवणे आणि कंबर थोडीशी खाली झुकवून नाचणे... असा डान्स कोणाचा हे विचारले तर देशातील लहान मुलगाही...
एक हात कंबरेवर, दुसरा हात भन्नाट स्टाईलमध्ये फिरवणे आणि कंबर थोडीशी खाली झुकवून नाचणे... असा डान्स कोणाचा हे विचारले तर देशातील लहान मुलगाही सांगळे की... ही अमिताभ बच्चनची फेमस स्टेप आहे. कुठल्याही सिनेमात, कार्यक्रमात अमिताभ बच्चन अशाच प्रकारचा डान्स करतो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे.
मात्र ही डान्स स्टेप बच्चनची नाही. चक्रावलात ना?
होय, आम्ही खरं सांगतोय. ही स्टेप बच्चनची नसून एक बड्या डान्सरची आहे. या मस्तमौला आणि हरफानमौला डान्सचा शोध भारतीय सिनेमाच्या एका स्टारने लावला होता, ज्यांना कदाचित आजची पिढी ओळखत नसेल. मात्र त्यांच्या डान्सची झलक अगदी अमिताभ बच्चन, गोविंदा, मिथुन चक्रवर्ती यांच्या डान्समध्ये आणि चित्रपटात दिसत असते.
भगवान आभाजी पलव म्हणजेच सगळ्या चित्रपटसृष्टीचे लाडके ‘भगवानदादा’. ज्यांच्यावर मागच्या 2-4 वर्षांपूर्वी मराठीत सिनेमाही आला होता.
खरं तर भगवान दादांनी 1938 मध्ये ‘बहादूर किसान’ या चित्रपटात पहिल्यांदाच काम केले होते, मात्र लोकांच्या मनात ते बसले ते 1952 ला आलेल्या 'अलबेला' या चित्रपटापासून. या चित्रपटात त्यांच्यासोबत गीता बाली यांनीही काम केले होते. या चित्रपटाने भगवान दादाला बॉलिवूड स्टार बनवले होते. भगवानदादांची सर्वात विशेष गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा भगवानदादा नाचायचे तेव्हा तेव्हा लोक हिरोईनला नाही तर भगवानदादांचा डान्स बघायचे. त्यांच्या डान्ससमोर भल्या भल्या हिरोईन फिक्या वाटायच्या. ‘बघावं आणि बघतच राहावं असा नाच म्हणजे भगवानदादा’.
त्या काळाचा विचार करता भगवान दादांचा डान्स इतका मखमली, नैसर्गिक आणि दिलखुश करणारा होता की आजचा कोणताही अभिनेता किंवा डान्सर त्यांचा मुकाबला करू शकला नसता. भगवान दादा एखाद्या गाण्याला एकदम आपलंसं करून घेत होते. त्या गाण्याला आपल्या एक्सप्रेशनचा असा तडका लावायचे की, बघणारे बघत राहायचे. ते नाचायला लागले की, आपले डोळेही भगवान दादांच्या डान्सबरोबर नाच करायचे.
अजूनही भगवानदादा तुमच्या लक्षात आले नसतील तर हे गाणं तर तुम्ही ऐकलाच असेल. ते म्हणजे... ‘भोली सूरत दिल के खोटे, नाम बड़े और दर्शन छोटे’. या गाण्यात जो व्यक्ती हवेसारखा नाचत आहे ते आहेत भगवानदादा.
https://youtu.be/H2uVRRFbJOU
अलबेला चित्रपटाची तर सर्वच गाणी Chartbusters आहेत. 'वो शोला जो भड़के' हे गाणे असो वा 'शाम ढले खिड़की तले तुम सीठी बजाना छोड़ दो' हे गाणे असो. या सर्व गाण्यांनी भगवान दादांना चित्रपटसृष्टीसाठी ‘डान्सचा भगवान’ बनवलं.
आता आपण बच्चन यांच्या त्या फेमस डान्स स्टेपची स्टोरी समजून घेऊ. बच्चन मुळातच उंच असल्याने त्यांना जास्त नाचता येत नव्हते. आणि त्यांनी भगवान दादांना ही स्टेप करताना पाहिले आणि त्यांना ही डान्स स्टेप आवडली. एवढी साधी, स्वाभाविक आणि भन्नाट डान्स स्टेप बच्चन यांनी करायला सुरुवात केली. आज ज्या व्यक्तीला नाचता येत नाही, तो व्यक्ती सुद्धा ही स्टेप सहज करू शकतो. मात्र ही स्टेप खऱ्या अर्थाने भगवान दादांनी शोधली होती.
गोविंदासारखे एक्सप्रेशन्स देणे कोणत्याही अभिनेत्यासाठी सोपी बाब नाही. कारण तो खूपच सहज आणि साधे एक्सप्रेशन्स देत असतो. गोविंदा डान्स करताना जे हसरे आणि अफलातून असे हावभाव करतो ना... त्याची सुरुवात भगवान दादांनी केली होती.
एका जागेवर उभे राहून फक्त एक्सप्रेशन्सद्वारे डान्स करण्याची कला भगवानदादांनी शोधली. आणि गोविंदाचा डान्स भगवान दादांकडूनच इंस्पायर्ड झालेला आहे.
आय एम अ डिस्को डांसर... हे गाणे ऐकल्यावर आपल्यासमोर येतो तो मिथुन चक्रवर्ती आणि त्याचा जबराट डान्स. एकेकाळी या गाण्याने अशी धमाल केली होती की, देशाच्या गल्लीगल्लीतील लहान मुलगाही या गाण्यावर मिथुनसारखा डान्स करायचा.
मिथुनचा हा एनर्जी असणारा डान्सही भगवानदादांची देन होती.
भगवान दादांचा अलबेला नंतर कोणताही चित्रपट जरी यशस्वी झाला नाही, परंतु त्यांनी तो डान्स आणि एकाच चित्रपटामुळे जी उंची मिळवली. ती मिळवण्यासाठी बड्या बड्या लोकांना अनेक वर्षे लागतात.
भगवान दादांचा डान्स फक्त डान्स किंवा करमणूकच नव्हती तर प्रत्येक सामान्य माणसासाठी ही एक क्रांती होती, ज्यामुळे सर्वांसाठी डान्स करणे सोपे झाले. आधी लोकांना डान्स करणे ही एक भली मोठी अवघड गोष्ट वाटायची. मीही सहज डान्स करू शकतो, ही भावना सामान्य माणसाच्या मनात आणण्याचे श्रेय भगवान दादांना जाते.
लेखक :- विनोदकुमार सूर्यवंशी
पिक्चरवाला
| ताज्या बातम्यांसाठी फॉलो
करा www.pikcharwala.com
| मनोरंजन
| लाइफस्टाइल | सेलिब्रिटी न्यूज |
टेलिग्राम
चॅनेल : https://t.me/pikcharwala
मो. 9503219649 | ईमेल : pikcharwala@gmail.com
COMMENTS